Ads

--

महाडच्या चवदार तळ्यातील पाणी ‘समतेचे अमृत’.

By Xtralarge News

March 21, 2026 11:24 am

Ads

महाडच्या चवदार तळ्यातील पाणी ‘समतेचे अमृत’

महाड, दि. २१ मार्च २०२६ :

मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश दिला. महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे ‘समतेचे अमृत’ असून या चवदार तळ्याचे पाणी घेऊन गावा-गावतील तलाव, नदी, धरणात सोडून ‘समतेचा संदेश’ सर्वदूर पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

 

महाडमध्ये ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महात्मा गांधी यांचे पणतु, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उल्का महाजन, गांधीवादी नेते जयंत दिवाण, काँग्रेसच्या एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाह आलम शेख, ॲड. श्रद्धा ठाकूर, अमर खानापुरे, फिशरमन काँग्रेसचे मार्तंड नाखवा, प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, पनवेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येना उपस्थित होते.

 

या कार्यक्रमानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सभागृहापासून चवदार तळ्यापर्यंत पदयात्रा करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व चवदार तळ्यातील पाणी कलशात भरून काँग्रेस पदाधिका-यांना दिले. हे पाणी सर्व जिल्ह्यांमध्ये गावागावात जाऊन नदी, तलाव व धरणातही सोडले जाणार आहे.

 

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे यासाठी महाडचा सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अप्रिय घटनांचा सामना करावा लागला पण त्यांनी कशाचीही पर्वा न करता हा सत्याग्रह केला. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशावेळीही बाबासाहेब यांना अशाच अप्रिय घटनांचा सामना करावा लागला होता. महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांतीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी यांचा विचार होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर मनुवादी प्रवृत्तींनी या चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले होते, त्याच विचाराचा वारसा महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, आजही या मनुवादी विचाराचा सामना आपल्याला करावा लागत आहे, आजही हा विचार अनेक व्यवस्थेपासून बहुजन समाजाला वंचित ठेवत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment