Ads

---

शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी..

By Xtralarge News

October 31, 2025 11:02 am

Ads

शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी..

मुंबई,  दि. ३१ ऑक्टोबर २०२५:

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये केली.

कर्जमाफीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीने एप्रिल २०२६ पर्यंत शिफारस करायची आहे. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे, कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही. म्हणून आता ३२ हजार कोटींच्या पॅकेज वितरणाला प्राधान्य आहे. पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून ३२ हजार कोटी रूपये मदत दिली जात आहे. आत्तापर्यंत ८००० कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत. या आठवड्याअखेर १८,५०० कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात ९० टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जाईल, यादृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश कुमार, शेतकरी आंदोलन शिष्टमंडळातील प्रतिनिधी माजी राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू, माजी मंत्री महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर, राजन क्षीरसागर, गिरीश दाभाडकर, अजित नवले यांच्यासह सर्व प्रमुख विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment