औरंगजेब प्रकरणी संताप पण शिवरायांच्या अपमानावर गप्प!
मुंबई, दि. ५ मार्च:
छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले.
याबाबत निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, अबु आजमीसारखी माणसं शरीरानं भारतात राहात असली तरी मनानं मोगलाईतच जगत आहेत. त्यांना देशाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी कसलंही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. औरंगजेब क्रुरकर्मा होता. तो कसला उत्तम प्रशासक. अशा राक्षसांची भलामण करणाऱ्या पिलावळीचा धिक्कार करतो.
अबु आझमींनी कितीही माजोरडी विधानं केलीत तरी त्याने इतिहास बदलणार नाही. कारण हा इतिहास मराठ्यांच्या शौर्याचा आहे. पराक्रमाचा आहे. नऊ वर्षात ६९ लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते. उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा असे सांगत “देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था,महा पराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था” या ओळीने उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केला.
Leave a Comment