Ads

--

महादजी शिंदे पुरस्काराने एकनाथ शिंदेंचा गौरव..

By Xtralarge News

February 12, 2025 11:16 am

Ads

महादजी शिंदे पुरस्काराने एकनाथ शिंदेंचा गौरव..

दिल्ली, दि. १२ फेब्रुवारी २०२५ ;

महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार असल्याने येणा-या जबाबदारीची जाणीव आहे. शरद पवार सारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात शिंदे बोलत होते.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, महादजी शिंदे यांचे घराणे सातारा जिल्ह्यातील कणेरखेड याच जिल्हात माझा ही जन्म झाला. तसेच माजी क्रिकेटपटू सदु शिंदे यांचे शरद पवार जावई आहेत. पवार साहेबांची राजकारणातील गुगली कळत नाही मात्र पवारांशी चांगले संबध आहेत, त्यामुळे ते मला गुगली टाकणार नाहीत, असे शिंदे म्हणाले.

पानिपतानंतर अवघ्या १० वर्षात महादजी शिंदे यांनी दिल्लीत भगवा फडकवला. महादजी शिंदेंमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता काबीज करण्यासाठी तब्बल ५० वर्ष वाट पहावी लागली. महादजी शिंदे नसते तर ब्रिटीशांची १५० नव्हे तर २०० वर्ष गुलामी सहन करावी लागली असती. त्यामुळेच ब्रिटीशांनी त्यांना ग्रेट मराठा ही पदवी बहाल केली होती. रणांगणात कामिगिरी फत्ते करणाऱ्या मावळ्यांना सोन्याचे सलकडं देण्याची इतिहासात प्रथा होती, माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे सोन्याचे सलकडं आहे अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

माझ्या मराठी मातीने केलेले हे कौतुक आहे. माझ्यासोबत अहोरात्र कष्ट करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचा, लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचा हा सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आपल्या पाठी पहाडासारखे उभे राहिले म्हणून महाराष्ट्रात अडीच वर्षात सरकारने प्रचंड काम केले. महादजी शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात येईल, तसेच कणेरखेड येथे महादजी शिंदे यांच्या राष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य सरकार विचार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

 

No comments to show.

Leave a Comment