ND स्टुडीओच्या व्यवसाय वृद्धीसाठी सल्लागार नियुक्त करा.
मुबंई,दि.६ जानेवारी २०२५ :-
एन डी स्टुडीओचे अद्यवातीकरण करुन याठिकाणचा व्यावसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ञ सल्लागार नियुक्त करावा. जेणेकरुन त्यांच्या माध्यमातून योग्य बदल आणि व्यावसायिक पद्धतीचा कृती आराखडा तयार करुन एनडी स्टुडीओची आर्थिक सक्षमता अधिक वाढवता येईल, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिल्या.
मंत्रालयात आयोजित एनडी स्टुडीओच्या अद्यावतीकरणाच्या कामाच्या आढावा बैठकीत मंत्री शेलार यांनी संबंधिताना सूचित केले. यावेळी आमदार महेश बालदी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह फिल्मसिटी तसेच एनडीस्टुडीओचे संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री शेलार म्हणाले की, राज्य शासनाची मराठी निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांना सहाय्यक ठरतील अशा पूरक सुविधा उपलब्ध करुन देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यादृष्टीने एनडी स्टुडीओचे अद्यावतीकरण हे भविष्यातील सिनेमा व मनोरंजन क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन करण्यात यावे. याच्या परिपूर्ण आराखडा निर्मितीसाठी तज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. या स्टुडीओच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण करण्यास भर देताना त्यात स्थानिकांना प्राधान्य दयावे. तसेच या स्टुडीओत उपलब्ध रिकाम्या जागेचा अधिक योग्य वापर करण्याच्या दृ्ष्टीनेही नियोजन करावे. या ठिकाणी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्ती जास्त संख्येन पर्यंटक, व्यावसायिक, निर्माते यांचा वावर वाढवण्यासाठी त्यात प्रामुख्याने मराठी सिरियल्स, सिनेमा, वेब सिरीज ओटीटी माध्यमात काम करणा-या निर्माते, कलाकारांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या,अशा सूचना शेलार यांनी संबंधितांना दिल्या.
Leave a Comment