Ads

--

वाल्मीक कराड भाजपा सरकारचा जावई आहे का ? 

By Xtralarge News

December 29, 2024 7:59 pm

Ads

वाल्मीक कराड भाजपा सरकारचा जावई आहे का ?

नागपूर, दि. २९ डिसेंबर ;

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणी ज्याच्यावर गंभीर आरोप आहेत तो सत्ताधारी पक्षाच्या एका मंत्र्याचा अत्यंत जवळचा असल्याचे सांगितले जाते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही ? परभणी मध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिस आक्रमक होती, बीडमध्ये कारवाई करताना पोलिसांच्या हाताला लकवा मारला आहे का? असा संतप्त सवाल माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

 

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून इतका मोठा मोर्चा निघाला पण त्यानंतर देखील सरकार जागे झाले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अजून अटक होत नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मीक कराड हा सरकारचा जावई आहे का? असा सवाल महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.

बीड मध्ये बिहार सारखी परिस्थिती झाली आहे. अनेक जमिनी लुटल्या, खंडणी मागितली जाते, महिलांवर अत्याचार होतात. संतोष देशमुख यांच्या हत्येसारखे प्रकरण होऊन पोलीस वाल्मीक कराडला अटक का करू शकत नाही.

परभणीमध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिसांना धार येते मग बीडमध्ये पोलिसांना लकवा का मारला आहे? संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला, त्यांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाही. वाल्मीक कराडची नार्को टेस्ट झाली पाहिजे. आतापर्यंत बीड मध्ये झालेल्या हत्या, खंडणी, महिला अत्याचार सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment