Ads

--

उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन.

By Xtralarge News

December 16, 2024 11:30 am

Ads

उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन.

मुंबई, दि. १६ डिसेंबर ;

प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. मागच्या काही वर्षांपासून हृदयविकाराशी झुंजत असलेल्या झाकीर हुसेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.

भारतीय अभिजात संगीताचा समृध्द खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे. हे नुकसान कधीही भरुन येणारे नाही. त्यांच्या तबला आणि डग्ग्याच्या जोडीत जणू नादब्रह्म सामावले होते अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

उस्ताद अल्लारखाँ साहेबांसारखा पिता आणि गुरु त्यांना घरातच लाभला. कुरेशी घराणे हे तालविश्वातील एखाद्या नक्षत्रासारखे अढळ होते. अतिशय साधी राहाणी, आणि कुठलाही कर्मठपणा व्यक्तिमत्त्वात नसलेले उस्तादजी रसिकांना क्षणार्धात आपलेसे करत. भजनी ठेक्यापासून तबल्याचे अवघड कायदे आणि अनवट ताल त्यांच्या बोटात जणू वस्तीला होते. दिग्गज गायक-वादकांना संगत तर ते करत होतेच, पण तीन-तीन तास तबल्याची सोलो मैफल रंगवणारे बहुदा ते पहिलेच उस्ताद असतील. तबलावादनाला सरस्वतीचे पूजन मानणारा हा कुणी देवदूतच पृथ्वीवर येऊन गेला, असे आता म्हणावे लागेल. झाले बहु होतील बहु, परंतु, या सम हा…हेच खरे.

अभिजात संगीताबरोबरच पाश्चात्य रॉक आणि पॉप संगीतातील तालही त्यांनी लीलया आत्मसात केले होते. म्हणूनच तीन वेळा त्यांना ग्रॅमी अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. या प्रतिभावान तालसम्राटाला अखेरचा दंडवत. भावपूर्ण श्रध्दांजली.

No comments to show.

Leave a Comment