बेळगावमध्ये कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक.
मुंबई, दि. १० डिसेंबर :
सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले.
यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य यांना अटक करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्यात आले. या कर्नाटक सरकारच्या कृत्याचा महाराष्ट्र सरकार तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
मी देखील मराठी भाषिकांच्या लढ्यात तुरुंगवास भोगला असून बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच भूमिका आमच्या सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने वकील दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील यापूर्वी या प्रश्नाबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन देखील कर्नाटक सरकार अशी भूमिका घेत असेल तर कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Leave a Comment