कंगणा व भाजपावर राऊतांची तोफ पुन्हा धडाडली..
मुंबई, दि.13 सप्टेंबर:
सुशांतसिंगच्या आत्महत्येपासून गळे काढत मुंबई व महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावणा-या कंगणा राणावत व तीच्या पाठीशी उभे राहणा-या भारतीय जनता पक्षावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या बेधडक स्टाईलने आज पुन्हा सपासप वार केले आहेत. कुणीही उठावं आणि मुंबई व महाराष्ट्राला शिव्या घालाव्यात हा धंदा बंद झाला पाहिजे असे ठणकावत राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही साद घातली आहे. ‘सामना’च्या ‘रोखठोक’मध्ये राऊत यांनी सर्व महाराष्ट्र द्रोह्यांचा समाचार घेतला आहे.
रोखठोकमध्ये काय म्हटले आहे……
‘महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख ‘बाबर’ असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रात भाजप उभा राहतो हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे,’ असे रोखठोकमध्ये म्हटले आहे.
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनाही आवाहन केले आहे. ‘राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,’
कुणीही उठावे आणि मुंबई-महाराष्ट्रावर चिखलफेक करावी हे आता तरी थांबले पाहिजे. मुंबईचे महत्त्व, मुंबईचे वैभव कमी केले की महाराष्ट्राचे आपोआप पतन होईल, असे ज्यांच्या मनात आहे ते मराठी माणसाला कमी लेखत आहेत,’ असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
रोखठोकमध्ये संजय राऊत पुढे लिहितात की, ‘एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध एकेरी भाषा बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? मुंबईला ‘पाकिस्तान’ म्हणायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिक स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ?
संपूर्ण नव्हे पण अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठ्या कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबडण्यासाठी व पैसे कमावण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. मुंबई महाराष्ट्राच्या बापाची आहे.
Leave a Comment