Ads

--

सरकारच्या फक्त घोषणा, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा..

By Xtralarge News

February 28, 2024 7:25 pm

Ads

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी –

राज्यात मंगळवारी रात्री १४ जिल्ह्यात मोठया प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र २४ तास होत असतानाही सरकारने साधे पंचनामे करण्याचे आदेश दिले नाहीत. सरकार नुसत्या घोषणा आणि घोषणा शिवाय काही करत नाही यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

सभागृहात बोलताना दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने अडवणूक, पिळवणूक होत आहे ते पाहता दगडाला पाझर फुटेल अशी स्थिती आहे. स्वामिनाथन आयोगाने सुचवलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन केले जात नाही. कापूस,सोयाबीन, धान, केळी व संत्रा पिकांचे नुकसान होत असताना सरकार शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे न्याय देऊ शकत नाही. कापसाला १ हजारा पेक्षा जास्त भाव मिळत नाही. हमीभावापेक्षा कमी भाव दिला तर गुन्हे दाखल करू याचा सरकारला विसर पडला आहे. सीसीआय केंद्र, कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना नाइलाजस्तव व्यापाऱ्यांना कापूस द्यावा लागतो. आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण झाली आहे. मुंबईत ४० रुपये दराने विकला जाणारा कांदा नाशिक, संभाजी नगर जिल्ह्यात ३ रुपये दराने विकला जातो. इतकी तफावत का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला.

 

सरकार कोट्यवधी रुपयांचे आकडे जाहीर करते मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहचत नाही. दुष्काळग्रस्त भागात जनतेला सवलती पोहचत नाहीत. कापसाचे आयात निर्यातीचे धोरण शेतकरी विरोधी आहे. कांदा, कापूस निर्यात करणे आवश्यक असताना शेतकऱ्यांचे अंगठे मोडण्याचे काम सरकार करत आहे. शेतकरी, बेरोजगार तरुणांना न्याय देण्यास हे सरकार असक्षम ठरलं आहे. नवीन कायद्याबाबत माथाडी कामगार त्रस्त असून आशा सेविका मोबदल्यासाठी टाहो फोडत आहेत.गिरणी कामगार घरासाठी आंदोलन करत असताना त्याकडे या सरकारच लक्ष जात नाही. बेकायदेशीर काम व धनदांडगे व्यावसायिक यांच्या मागे हे सरकार उभं असून सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.

राज्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार माजला असून मुंबई, नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचे धिंदोडे निघाले आहे. मुंबई, नवी मुंबईत दलालांचा सुळसुळाट असून हप्तेबाजीखोरांचे जाळ पसरले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात या सरकारला अपयश आलं. नवी मुंबईचे परिमंडळ २ चे उपायुक्त विवेक पानसरे व पंकज ढहाणे हे मुख्यमंत्री यांच्या पक्षात येण्यासाठी दुसऱ्यांच्या फोनवरून धमक्या देत आहेत. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, भक्ती कुंभार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ही दानवे यांनी ताशेरे ओढले. तलाठी भरती घोटाळा, संभाजी नगर जिल्ह्यात निर्वासितांची २५० एकर मालमत्ता ३ दिवसांत एका व्यक्तीच्या नावे केल्याप्रकरणीचा महसूल विभागातील घोटाळा अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणला.

 

No comments to show.

Leave a Comment