Ads

-

महिला सशक्तीकरणाचा लाभ ३८ हजार महिलांना..

By Xtralarge News

January 10, 2024 1:03 pm

Ads

महिला सशक्तीकरणाचा लाभ ३८ हजार महिलांना..

 

गडचिरोली, दि १० जानेवारी :

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे, महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे. या अभियानातून शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील 38 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. यापुढच्या काळात देखील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.

महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा आजचा दिवस आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली असून बचत गटाच्या अर्थसहाय्यात दुप्पट वाढ केली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पहिल्यांदाच गडचिरोलीमध्ये ऐवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. राज्याला कर्तृत्ववान महिलांचा वारसा आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या एक पाऊल पुढे आहे. स्वत:च्या तब्बेतीकडे महिला दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्यात आतापर्यंत 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येणारा मागास हा शब्द पुसून टाकला असून मुख्य प्रवाहाकडे गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. आज सुरजागडच्या माध्यमातून 10 हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या उद्योगाचे विस्तारीकरण लवकरच होणार असून आणखी 10 ते 15 हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल. आजच्या कार्यक्रमात लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, टिलर, ड्रोजर, हार्वेस्टर तर शालेय मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. भविष्यात गडचिरोलीतील 10 हजार शालेय मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येईल.

‘शासन आपल्या दारी’ योजनेतून राज्यातील जवळपास 2 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त जणांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच येथे उभारण्यात आलेल्या स्कील सेंटरमधून दरवर्षी 5 हजार तरुण- तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल. राज्यातील 1 कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न असून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच ब्रँडींग, मार्केटिंग आदी बाबींकरीता जिल्हा प्रशासनाला सुचना करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

 

No comments to show.

Leave a Comment