माझगाव डॉक पतसंस्थेला मुंबई बँकेचे सर्व सहकार्य !
मुंबई, दि. २ ऑगस्ट :-
माझगाव डॉक शिपबिल्डर्स कर्मचारी सहकारी पतपेढीचा शतक महोत्सव सोहळा नुकताच पार पडला. या शतक महोत्सव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी माझगाव डॉक पतसंस्थेला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे सहकार्य लागेल ते संपूर्ण ताकदीनीशी दिले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, या कार्यक्रमात एक कौटुंबिक स्वरूप आहे. मी अनेक कार्यक्रमांना जातो, सहकारी संस्थांच्या जातो परंतु आपल्या संस्थेविषयी जी आत्मीयता असते ती मला माझंगाव डॉक पतपेढीच्या कार्यक्रमात पाहायला मिळाली. प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत आज शंभरी पार करणे सोपी गोष्ट नाही. एखादी संस्था काढणे सोपे असते परंतु तीची एवढी प्रदीर्घ अशी वाटचाल करणे अवघड असते व ते अवघड काम आपण सर्वांनी मिळून केले असल्याचे दरेकर म्हणाले.
माझगाव डॉकमध्ये आपण सर्व कष्ट करणारी लोकं, कर्मचारी आहेत. मुंबईत धकाधकीच्या जीवनात आपल्याला अत्यंत अडचणीच्या काळात आर्थिक गरज लागते तेव्हा मदतीचा हात कोण देत असेल तर ती आपली पतसंस्था आहे. सभासदांच्या हितासाठी चांगल्या योजना राबवून त्यांना ताकद देण्याचे मोठे काम पतसंस्था करते याचा मला अभिमान आहे. आपल्या पतसंस्थेची उलाढाल १४० कोटी आहे. मुंबईसारखे आर्थिक शहर, माझगाव डॉकसारखी विश्वासार्ह मोठी इन्स्टिटयूशन केंद्र सरकारच्या अधीपत्याखाली असणारी ही संस्था हिचा आणखी मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होणे गरजेचे आहे. निश्चितच जेजे संचालक मंडळ आले असेल त्यांनी आपापल्या परीने, क्षमतेने संस्थेला ताकद देण्याचा प्रयत्न केला असेल. म्हणूनच शतकोत्तर वाटचाल आपण करतोय. परंतु ही संस्था आणखी मोठी झाली पाहिजे. यासाठी मुंबई जिल्हा बँकेकडून जे सहकार्य लागेल ते संपूर्ण ताकदीनीशी दिले जाईल, असे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले.
सहकार सशक्त व्हायला पाहिजे तर प्राथमिक संस्थांपासून जिल्हा, राज्यस्तरीय संस्था सशक्त झाल्या पाहिजेत. अशा संस्थांनी चौकटीच्या बाहेर येऊन काम केले पाहिजे. आपण मोठी झेप घेतली पाहिजे. या प्रयत्नांनाही संचालक मंडळाने येणाऱ्या काळात काम करण्याची गरज आहे. पगारदार पतसंस्था यांना आमच्याकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज जाते. ते सुरक्षित कर्ज असते. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सातत्याने काहीतरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला आहे.
सहकारबाबत आज वाईट अवस्था आहे. सहकार चांगले काम करतो ते कोणाला दिसत नाही. परंतु सहकारात चार ठिकाणी उणीवा दिसल्या तर संपूर्ण सहकार वाईट आहे अशा प्रकारची भुमिका सातत्याने घेतली जाते. सहकाराचे महाराष्ट्राच्या विकासात फार मोठे योगदान आहे. ग्रामीण भागाच्या विकासात, अर्थव्यवस्थेत सहकाराच्या माध्यमातून मोठे योगदान दिले गेलेय. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. राज्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी सुत गिरण्या, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या संस्थांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम झाले असल्याचेही दरेकर म्हणाले.
महाराष्ट्रात नागरी अर्बन बँका ५०० च्या आसपास आहेत. परंतु २००-२५० नागरी अर्बन बँका अडचणीत आल्या आहेत. म्हणून राज्य सरकारला विधिमंडळात सांगितले की, आपण प्रत्येक घटकाला मदत करतो. ज्या नागरी बँक पतसंस्था मेहनतीने चालवतात त्या अडचणीत आल्यावर सरकार म्हणून बॅक अप देण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात सरकारला या प्रकरणी लक्ष घालायला भाग पाडतोय, असेही दरेकर म्हणाले. तसेच आज अनेक पतसंस्था अडचणीत आहेत. पतसंस्थांचे डिपॉझीट असते त्याला संरक्षण नसते. अर्बन बँकांचे डिपॉझीट असेल तर त्याला ५ लाखाच्या ठेवीना संरक्षण आहे. पतसंस्थांनाही अशाच प्रकारे डिपॉझीट मिळण्यासाठी भुमिका घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.
यावेळी मुंबई जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अध्यक्ष संजीव सिंगल, डॉ. संतोष कुमार मलिक, कमांडर वासुदेव पुराणिक, बी. एस. गायकवाड, माझगाव डॉक कर्मचारी पतपेढी अध्यक्ष महेश शेवाळे, सरचिटणीस गणेश परब यांसह सर्व संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आमची बँक आपली पालक बँक आहे. पालकत्वाच्या भूमिकेतून ज्याज्या सभासद संस्था आहेत त्या टिकल्या पाहिजेत. त्या माध्यमातून जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला मदत झाली पाहिजे ही भावना घेऊन मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक काम करतेय. सामाजिक दायित्व जपणारी जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकमेव बँक आहे. समाजासाठी मदत करायची असेल तर त्यावेळी जिल्हा बँक धावून जाते. शेतकऱ्यांना मदत, तौकते चक्रीवादळ आले तेव्हा, सीमेवर जवान शहीद झाला तर त्याच्या कुटुंबियांना मदत केली जाते. गिरणी कामगारांच्या घरांसाठी पैसे उपलब्ध करून देणारी बँक ही मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक होती, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.
Leave a Comment