Ads

-

मुंबईतील ‘बेस्ट’ची वीजही अदानीच्या घशात ?

By Xtralarge News

July 28, 2023 2:29 pm

Ads

मुंबईतील ‘बेस्ट’ची वीजही अदानीच्या घशात ?

मुंबई, दि. २८ जुलै;

मुंबई शहराला वीज पुरवठा हा बेस्ट अंडरटेकिंगकडून होतो. पण येत्या सप्टेंबर महिन्यापासून मुंबई शहरांत अदानी इलेक्ट्रिकल कंपनीची मीटर्स बसवली जातील, ज्याचं टेंडर पास झालं आहे. ही ऑटोमॅटिक प्रीपेड मीटर्स असतील, ती सगळ्यांना कम्पल्सरी होतील. बेस्टच्या खाजगीकरणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. सामान्य मुंबईकरावर आणला जाणारा मोठा आर्थिक बोजा असून काँग्रेस पक्षाचा ह्या प्रीपेड मीटर कल्पनेला विरोध आहे, अशी माहिती बीएमसीतील काँग्रेस नेते रवी राजा यांनी दिली.

रवी राजा यांनी यांनी म्हटले आहे की, या प्रिपेड मीटर्सची किंमत ९५०० रुपये प्रतिमीटर आहे. ह्यातील १३०० रुपये केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेले पैसे हे बेस्ट अंडरटेकिंग देणार आहे. हे कॉन्ट्रॅक्ट जवळपास १३०० कोटी रुपयांचं आहे. मुळात तोट्यात सुरु असलेल्या बेस्ट अंडरटेकिंगला इतका मोठा आर्थिक भार सोसणार आहे का? ह्या कंपनीला १० वर्षांसाठीचं मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे.

ही मीटर्स प्रीपेड आहेत हा सगळ्यात मोठा धोका सामान्य मुंबईकरांसाठी आहे. मुंबई शहरात बेस्टचे १०.५० लाख ग्राहक आहेत, त्यातील ४०% मीटर्स ही झोपडपट्टीत राहणाऱ्या घरांत आहेत, ३०% मध्यमवर्गीय नोकरदारांच्या घराची आहेत. प्रीपेड मीटर ही कल्पना ह्या वर्गाला धोक्याची आहे.

ज्यांचं आयुष्य दर महिन्याच्या पहिल्या तारखेला येणाऱ्या पगारावर अवलंबून आहे अशा लोकसंख्येला प्रीपेड मीटरचा बॅलन्स संपायला आल्यास त्याचा रिचार्ज करणं कसं शक्य होईल? ही ग्राहकांची लूट ठरेल आणि हे सगळं ह्या कंपनीच्या फायद्यासाठी केलं जात आहे, हे उघड आहे. ही कंपनी वीजबिलांची प्रीपेड वसुली करून ते बेस्ट प्रशासनाला देणार.

No comments to show.

Leave a Comment