Ads

--

खारघर प्रकरणी दिर्घ चर्चा करतो पण…. !

By Xtralarge News

July 21, 2023 11:57 pm

Ads

खारघर प्रकरणी दिर्घ चर्चा करतो पण…. !

मुंबई, दि. २१ जुलै :

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर चेंगराचेंगरी झाली नसून, व्यवस्थेत कुठेही कमतरता नव्हती. ऊष्माघात होवून झालेला श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाला, ही वस्तुस्थिती असून या संदर्भात विरोधकांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत; सरकारी यंत्रणा आणि श्री सदस्य यांच्यात व्यवस्थेबाबत उत्तम समन्वय होता अशी स्पष्टोक्ती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

 

खारघर येथे 16 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला; यासंदर्भात कॉंग्रेसचे भाई जगताप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. भाई जगताप यांनी सुरुवातीलाच बोलताना या सोहळ्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचा उल्लेख केला. त्यावर ना. मुनगंटीवार म्हणाले मृतांचा शवविच्छेदन अहवाल माझ्याकडे आहे, यामध्ये मृताना धक्काबुक्की किंवा खरचटल्याच्या खुणा आढळल्या नाहीत असा उल्लेख आहे; इतर लोक जे दवाखान्यात उपचार घेत होते त्यांनीही अश्या प्रकारची तक्रार केली नाही; असे असताना जनतेला भ्रमित करण्यासाठी सभागृहात असा प्रश्न उपस्थित करणे दुःखदायक आहे.

मुनगंटीवार म्हणाले, कार्यक्रमासाठी कार्यरत असलेली प्रशासकीय यंत्रणा आणि श्री सदस्य यांच्यात उत्तम समन्वय होता. श्री सदस्यांकडून सूचना मागविल्या जात होत्या, त्यानुसार व्यवस्था करण्यात येत होती. राज्याच्या सर्व यंत्रणांसह आपत्कालीन विभाग, हवामान विभाग यांच्या सूचना, उपाय यानुसार व्यवस्था होती; कुणाच्या साठी म्हणून सकाळी 10 ची वेळ ठरली नव्हती तर श्री सदस्यांच्या सोयीने आणि व्यवस्थेला अनुकूल अशी वेळ निश्चित केली होती, त्यामुळे यासंदर्भात विनाकारण राजकारण आणून फक्त आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे.

यापूर्वी राज्यांत घडलेल्या अश्या घटनांचा दाखला देत ना. मुनगंटीवार यांनी चौकशी समितीला मुदतवाढ देण्याचे मुद्यांचे समर्थन केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या काळातील दुर्घटनांमध्ये झालेले मृत्यू, त्यानंतर तत्कालीन मंत्र्यांची भाषणे आणि तत्कालीन विरोधी पक्षाची भूमिका याचा पुराव्यासह ना मुनगंटीवार यांनी लेखाजोखा मांडायला सुरुवात केली तेव्हा विरोधक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. ना मुनगंटीवार शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तरे देत असताना विरोधक आणि सत्ताधारी आमदार यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती.

No comments to show.

Leave a Comment