Ads

-

समृद्धी महामार्ग राज्याचा आर्थिक काॅरिडॉर ठरणार….

By Xtralarge News

May 27, 2023 11:47 am

Ads

समृद्धी महामार्ग राज्याचा आर्थिक काॅरिडॉर ठरणार….

 

शिर्डी, दि. २७ मे :

राज्याचा विकास करायचा असेल तर विकासात मागास असलेला भाग मुंबई व पोर्टशी जोडणे अत्यंत आवश्यक होते. समृद्धी महामार्ग राज्याचा आर्थिक काॅरिडॉर ठरणार आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांचे भाग्य यामुळे बदलणार आहे. ७०१ किलोमीटर महामार्गाची उभारणी विक्रमी अशा ९ महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणारा समृद्धी हा देशातला एकमेव महामार्ग आहे, असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

महामार्गासाठी केलेल्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांना विक्रमी मोबदला देण्यात आला. पुढील सहा महिन्यात समृद्धी प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. महामार्गावर वाहन चालकांनी वाहन चालवितांना वेग मर्यादा पाळावी. असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

समृद्धी महामार्ग, ट्रान्स हॉर्बर लिंक रोड, कोस्टल रोड सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा बळकट होणार आहेत. नागपूर ते गोवा, मुंबई ते गोवा या महामार्गामुळे येत्या काळात महाराष्ट्राचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम शासन करत आहे असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. यामुळे हा परिसर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाशी जोडला जाणार आहे. समृद्धीच्या भूसंपादनासाठी शिर्डी व परिसरातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले. शिर्डी विमानतळाच्या ६०० कोटींच्या टर्मिनल इमारतीमुळे विमान फेऱ्या वाढणार आहेत.

 

समृद्धी महामार्ग दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये –

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. शिर्डी ते इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून लांबी ८० कि मी आहे. दुसऱ्या टप्प्यात आजपासून ७०१ कि.मी पैकी आता एकूण ६०० कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला झाला आहे.

 

No comments to show.

Leave a Comment