Ads

--

भ्रष्ट मंत्र्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारला किंमत मोजावी लागेल.

By Xtralarge News

December 29, 2022 11:25 pm

Ads

भ्रष्ट मंत्र्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारला किंमत मोजावी लागेल..

नागपूर, दि. २९ डिसेंबर :-
औद्योगिकदृष्ट्या अव्वल महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर चालले आहेत. युवकांचे रोजगार बुडत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्री, अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. अंधश्रद्धांना खतपाणी घातले जात आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. उच्चपदस्थ व्यक्ती, मंत्री, लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये सातत्याने केली जात आहेत. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही. सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा स्पष्ट इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विरोधी पक्षांतर्फे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांनी महापुरुषांबद्दलची अवमानकारक वक्तव्ये, मंत्री व अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, राज्याबाहेर चाललेले उद्योग, त्यामुळे वाढलेली बेरोजगारी, महिलांवरील वाढते गुन्हे, अंधश्रद्धेला घातले जाणारे खतपाणी असे अनेक मुद्दे उपस्थित करत राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी. भ्रष्टाचार करणारे सत्तारुढ किंवा विरोधी पक्षातील असले तरी त्यांच्यावर कारवाई करावी. महिलांना संरक्षण द्यावे. राज्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण करुन उद्योगांना राज्याबाहेर जाण्यापासून रोखावे, अशा अनेक मागण्या अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात केल्या. महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही पाठींबा देऊ, असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.

No comments to show.

Leave a Comment