Ads

--

प्रशांत दामलेंना पद्म पुरस्कार देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवला..

By Xtralarge News

November 6, 2022 9:07 pm

Ads

प्रशांत दामलेंना पद्म पुरस्कार देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवला..

मुंबई, दि.६ नोव्हेंबर :
मराठीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याबाबतच्या शिफारशीचा प्रस्ताव मागणी करण्याअगोदरच केंद्र सरकारला पाठवला आहे असे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी सांगितले. निमित्त होतं प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे..

माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दामले यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नाटकांचे तब्बल १२ हजार ५०० प्रयोग अभिनेते प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्यादृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दामले यांचे अभिनंदन केले. कलावंताना मोठं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये चित्रनगरी उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

राज्यातील नाट्यगृहाची स्थिती सुधारण्यासाठी त्या नाट्यगृहांची दुरूस्ती करण्याबाबत यापूर्वी बैठक घेवून निर्देश दिले आहेत. खराब स्थितीतील नाट्यगृहांच्या पाहणीसाठी एक नोडल अधिकारी नेमला जाईल आणि त्या नाट्यगृहांची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

लोकांच्या भेटीगाठी, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने नियोजित कार्यक्रमांना पोहोचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२५०० व्या प्रयोगाचा पहिला भाग पाहायला मिळाला नाही. या प्रयोगाचा शो ठाण्यातही होणार आहे तो पूर्ण पाहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. हे जनतेचे, सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. आमच्या सरकारला तीन महिने झाले आहेत. आणखी लोकहिताची कामे करायची आहे,  थोडा वेळ द्या, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

मराठी नाट्यसृष्टीबद्दल बोलतांना जसे विष्णूदासांचे नाव घेतले जाते तसे आता प्रशांत दामले यांचे नाव घेतले जाईल. कलेची सेवा ते सातत्याने करतात. समर्पण भावनेने काम करणाऱ्यांचा सन्मान होत आहे. आता १२, ५०० प्रयोग झाले, भविष्यात २५ हजार प्रयोग करावे. नाटकाचा निखळ आनंद लुटला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment