Ads

-

नदी संवाद यात्रेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समिती

By Xtralarge News

October 15, 2022 12:30 pm

Ads

नदी संवाद यात्रेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समिती…

मुंबई, दि.१५ ऑक्टोबर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबरला प्रारंभ झालेल्या “चला जाणूया नदीला ” अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा आता राज्यभर वेग घेणार असून वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय तसेच जिल्हावार समित्यांची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्य सचिव राज्यस्तरीय समितीचे प्रमुख असतील. यासंदर्भातील शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे. या अभियानाचे यश लोकसहभागात असून, प्रत्येक समितीने लोकसहभाग जास्तीत जास्त राहील यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. त्यावर उपाय म्हणून नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करणे हे या अभियानातून अभिप्रेत असून लोकसहभागातून हे अभियान निश्चित यशस्वी होईल व  प्रत्येक समिती  त्या दृष्टीने काम करेल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होते आहे. परिणामी पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आहे. वाढते नागरीकरण, आणि औद्योगीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. येणाऱ्या काळात नद्यांचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी “चला जाणूया नदीला” अभियान राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे.

या अभियानाचे उहिष्ट प्रामुख्याने जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे, नागरीकांच्या सहकार्याने नद्यांचा सर्वकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे असणार आहे. तसेच नदीला अमृत वाहिनी बनविण्यासाठी कार्यक्रमाचा मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रुपरेषा आखणे, नदीचा तट, प्रवाह आणि परिसरातील जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्हयात प्रचार प्रसार याबाबत नियोजन करणे, नदी खोऱ्यांचे नकाशे, नदीची पुर रेषा व पाणलोट क्षेत्रांचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी या बाबतची माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे यावर भर असेल. याचबरोबर अभियानाबाबत जनजागृती करणे,अतिक्रमण, शोषण आणि प्रदुषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे, नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे ही कामेही या समित्या करतील. नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.

No comments to show.

Leave a Comment