समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं?
राज्यपालांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याने नवा वाद.
औरंगाबाद, दि. २८ फेब्रुवारी:
समर्थ रामदास यांच्याशिवाय शिवाजीला कुणी विचारलं असतं? असे विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन वादाला तोंड फोडलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राज्यातील वातवरण तापले आहे.
औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”,
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसंच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे आयोजीत समर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. संत साहित्य शिक्षण व संशोधन प्रतिष्ठान समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट. समर्थ वाग्देवता मंदिर धुळे आणि समर्थ मंदिर संस्थान जांब यांच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केलं.
Leave a Comment