Ads

--

पंढरपूरमध्ये 6 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स!

By Xtralarge News

August 5, 2020 10:23 pm

Ads

180 बेडची क्षमता विकसित : प्रांताधिकारी ढोले

सोलापूर, दि. 5 ऑगस्ट

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूर शहरातील सहा हॉस्पिटल अधिग्रहीत करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. यापैकी उपजिल्हा रुग्णालयासह सहा हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असून बेडची संख्या 180 आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विठ्ठल हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर विकसित करण्यात आले आहे.

पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत. यामध्ये संपर्क शोधणे, तपासणी व उपचार करणे तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करणे यावर भर देण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची व्यापक प्रमाणात रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत, असे ढोले यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील लाईफलाईन, गॅलॅक्सी, गणपती, जनकल्याण, विठ्ठल,ॲपेक्स तसेच उपजिल्हा रुग्णालय अशी एकूण सात हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून सुरु करण्यात आली आहेत. तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी रोहन व निष्कर्ष पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातूनही तपासणी करण्यात येणार आहे. या दोन्ही खाजगी लॅबना तपासणीसाठी परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला असल्याचेही ढोले यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले असून या पथकामार्फत नागरिकांची तपासणी व जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मेडीकल असोशिएनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे यांच्यामार्फत गंभीर रुग्णांना उपयुक्त ठरणाऱ्या इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन बाधितांचे वेळेत निदान करणे शक्य होईल, असे आवाहनही  ढोले यांनी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment