Ads

--

… हा भ्याड हल्ला संपूर्ण मराठी अस्मितेवरचा हल्ला !

By Xtralarge News

December 14, 2021 10:17 am

Ads

… हा भ्याड हल्ला संपूर्ण मराठी अस्मितेवरचा हल्ला !

मराठी भाषकांचा आवाज कदापी दबणार नाही…

मुंबई, दि. 14 डिसेंबर :
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. या घटनेमुळे मराठी भाषक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. दीपक दळवींसह मराठी भाषक चळवळीच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असे ठणकावून सांगत मराठीचा आवाज कदापी दबणार नाही, असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा निषेध करून पवार पुढे म्हणाले की, सीमा भागातील मराठी भाषकांचा हक्क जपणे, त्यांच्या अस्मितेचे संरक्षण करणे, सीमाागातील मराठी बांधव सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने लढत आहेत, त्यांच्या पाठीशी राहणे, हे आमचे कर्तव्य आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही.

मराठीभाषक चळवळीला धक्का देण्यासाठी हे भ्याड कृत्य सुनियोजित पध्दतीने करण्यात आले असावे. मात्र, अशा घटनांमुळे मराठी भाषक आंदोलनावर, चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. लढणं हे मराठी भाषकांच्या रक्तात आहे, त्यामुळे मराठी भाषकांना जेवढं दाबण्याचा प्रयत्न होईल, तेवढी मराठी भाषकांची चळवळ आणखी उसळी घेईल. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या मराठी सैनिकाच्यामागे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस, महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No comments to show.

Leave a Comment