Ads

--

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली २०२४ साली दिल्लीतही चमत्कार होईल !

By Xtralarge News

December 12, 2021 2:57 pm

Ads

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली २०२४ साली दिल्लीतही चमत्कार होईल !

नाशिक, दि.१२ डिसेंबर:

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा जो चमत्कार झाला तसाच चमत्कार २०२४ साली दिल्लीत होईल. त्यासाठी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित व्हर्चुअल रॅली प्रसंगी ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, देशात साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यासह विविध महत्वाच्या क्षेत्रात पवारांचे मोलाचे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेले काम जगभरात गाजले असून कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे काम त्यांनी केले. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे आज देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून फळबाग लागवड क्षेत्रातही अग्रभागी आहे. त्यांच्या या विशेष योगदानामुळे आज जगभरात अन्नधान्याची व फळांची निर्यात आपण करू शकत आहे.

आजवर अनेक संकटांना पवारांनी तोंड दिले आहे. कितीजरी मोठं संकट त्यांच्यासमोर आलं तरीदेखील पवारांचा संयम कधीही ढळणार नाही ही विशेष बाब आहे. आज देशभरात जो ओबीसींचा प्रश्न गाजत आहे. त्या ओबीसी समाजाला सर्वप्रथम महाराष्ट्रात आरक्षण देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. राज्यात मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासह अनेक क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतले. त्यामुळे महाराष्ट्र एका उंचीवर पोहचला.

व्हर्चुअल रॅली प्रसंगी नाशिक येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब कर्डक, नगरसेवक जगदिश पवार, समिना मेमन, सुषमा पगारे, नाशिक महानगरपालिका माजी विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक, माजी नगरसेवक शैलेश ढगे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, संजय खैरणार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment