‘ओमायक्रॉन’वर मात करण्यासाठी लसीकरण वाढवा..
लातूर, दि. 12 डिसेंबर :
नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात अधिकाधिक लसीकरण करून घ्या. पहिला डोस 75 टक्के नागरिकांनी घेतला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. आपला जिल्हा सुरक्षित ठेवायचा असेल मास्क वापरावा तसेच 100 टक्के लसीकरण करून घ्यावे. लसीकरण वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, एन.जी.ओ, विविध कंपन्या, साखर कारखाने यांनीही यात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
लातूर जिल्हा वार्षिक नियोजन आणि कोरोना संसर्ग वाढू नये यासाठीचे निर्बंध आढावा बैठक नियोजन भवन येथे आयोजित केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.
कोरोनामुळे विकास कामावर परिणाम झाला असून या आर्थिक वर्षातल्या निधीला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी. संबंधित विभागांनी हा निधी विकास कामासाठी करावा. अखर्चीत निधी 31 मार्च नंतर परत करायची वेळ येऊ देऊ नका अशा सूचनाही प्रशासनाला उपमुख्यमंत्री यांनी दिल्या. ज्या ज्या आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत, त्या सुविधा उत्तम चालाव्यात आणि नागरिकांना त्याचा लाभ व्हावा यासाठी आरोग्य विभागांनी काम करावे अशा सूचना दिल्या. लातूर शहरात नवीन रुग्णालय उभं करण्यासाठी लागणाऱ्या जागे बद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकी समोर ठेवावा, शासन त्याला मान्यता देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सर्व हॉस्पिटलचे फायर ऑडिट करून घ्यावे, त्यात ज्या त्रुटी दाखविल्या आहेत त्या त्रुटी काढतांना गुणवत्तापूर्ण काम करावे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले हे काम तात्काळ करून घ्यावे. आपली एक चूक दुर्घटनेसाठी कारणीभूत ठरू नये यासाठी सर्व यंत्रणानी काम कराण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. रमाई आवास योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र रोहित्र बसविण्यासाठीही उपमुख्यमंत्र्यांनी अनुकलता दर्शविली आहे.
जिल्ह्यातील बालकांच्या दिव्यांगावर मात करण्यासाठी त्यांच्यावर उपचार व्हावेत, म्हणून त्यासाठी लागणारे उपकारण आणि त्यात बालकांचे मनोरंजन व्हावे म्हणून तसे पूरक चित्रं काढले आहेत. हे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी आणि जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सादरीकरणातून दाखविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून आपण इतर जिल्ह्यातही करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Leave a Comment