Ads

-

साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी

By Xtralarge News

November 16, 2021 11:08 am

Ads

साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी.

नाशिक, दि. 16 नोव्हेंबर:
साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे केवळ साहित्य संमेलन नाही तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व आयोजकांनी नियोजन करावे, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

भुजबळ नॉलेज सिटी येथे ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक शहर व परिसर सुशोभीकरणावर अधिक भर देण्यात यावा. आपल्या दर्जेदार व्यवस्थेतून येणाऱ्या साहित्यप्रेमिंना ज्या सुविधा मिळतील त्यातून नाशिकचे नाव देशपातळीवर पोहचणार आहे. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी शटल बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. साहित्य संमेलनाचा उत्सव दर्जेदार होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्वाचे असणार आहे. स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक आदरतिथ्य करणारे नाशिक याद्वारे अवघ्या साहित्य विश्वासमोर जाणार आहे.

आयोजनाच्या संदर्भात लोकप्रतिनिधीं समवेत देखील आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन ही प्रत्येकाचा जबाबदारी समजून कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करू. पर्यटन विभागाचे केंद्र या संमेलन स्थळी उभारण्यात येऊन नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगताना जिल्हा प्रशासन, माहापालिका प्रशासन पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणांनी आपापल्या परिने यांत योगदान देवून अनेक वर्षे स्मरणात राहील असे दर्जेदार साहित्य संमेलन व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी करून तेथे करण्यात आलेल्या सेवा-सुविधांची माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी करून घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत माजी आमदार हेमंत टकले, विश्वास ठाकूर, जयप्रकाश जातेगावकर यांनी सहभाग घेतला.

No comments to show.

Leave a Comment