Ads

-

एसटीचे १५०० कर्मचारी कामावर परतले, ३६ गाड्या धावल्या

By Xtralarge News

November 13, 2021 11:08 am

Ads

एसटीचे १५०० कर्मचारी कामावर परतले, ३६ गाड्या धावल्या.

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील.

मुंबई, दि. १३ नोव्हेंबर :
एसटी कर्मचा-यांनी संप मागे घ्यावा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत असून विविध आगारातून ३६ गाड्या धावल्या, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे दिली. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक सुरू करण्याची आमची इच्छा आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, त्याची कुठेही अडवणूक होता कामा नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत घेतली जात आहे. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. कामगारांच्या उपस्थितीमुळे आज ३६ बसेस रवाना केल्या. सुमारे ८०० ते ९०० प्रवाशांनी प्रवासदेखील केला आहे. याशिवाय खासगी वाहनेदेखील आगारातून सोडल्या जात आहेत. संपामुळे एसटी महामंडळाचे सुमारे १२५ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचेही चन्ने यांनी सांगितले.

एसटीचे कर्मचारी कामावर परतावे यासाठी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब तसेच एसटी महामंडळ प्रशासनानेही आवाहन केले आहे. त्यानुसार अनेकांना कामावर परतायचे आहे. जे कामावर येतील त्यांना संरक्षण दिले जाईल, असे सांगतानाच अनेक कर्मचारी डेपो सुरू करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे लवकरच एसटीची वाहतूक सुरु होईल. त्यामुळे हा संप सुरू न ठेवता सर्व कामगारांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, असे आवाहनही शेखर चन्ने यांनी केले.

 

No comments to show.

Leave a Comment