आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणास सर्वोच्च प्राधान्य
लोणावळा, दि. 21 ऑक्टोबर :
कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना दीर्घकाळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय तसेच विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
नागरीकांच्या आरोग्याला शासन सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटाचा अनुभव लक्षात घेता दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत लोणावळा शहरात १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभे करण्यात येत आहे. लोणावळा व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना पुढील काळात उत्तम उपचार सुविधांसाठी हे उपजिल्हा रुग्णालय उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण तसेच दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी आरोग्य विभागाला आवश्यक निधी देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयासोबतच अनेक प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ४१ कोटी रुपये खर्च करून लोणावळा शहरात उभारण्यात येणाऱ्या १०० खाटांच्या रुग्णालयात सर्व सोईसुविधा असणार आहेत. लोणावळा शहरासह मावळ परिसरातील विकासकामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
लोणावळा परिसराच्या सर्वांगीण विकासासोबतच पर्यटन विकासाला गती देण्यासाठी योजना हाती घेण्यात येणार आहेत. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळा प्रसिद्ध आहे. त्यामुळे लोणावळ्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी व रोजगार वाढीसोबतच या परिसरात आर्थिक सुबत्ता यावी, यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल असेही अजित पवार म्हणाले. कोरोनाचे संकट अजून टळलेले नसल्याने कोरोना मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही अजित पवार यांनी केले.
Leave a Comment