Ads

-

दर्जाहीन कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा

By Xtralarge News

September 30, 2021 11:55 am

Ads

दर्जाहीन कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा.

मुंबई, दि. 30 सप्टेंबर:
राज्यातील खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, नगरविकास मंत्री यांनी यावर चर्चा केली.

रस्त्यांची कामे करताना तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे असे सांगून ज्या कंत्राटदारांनी चांगली कामे केली आहेत, अशांचा विचार करा, दर्जाहीन कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण चव्हाण यांनी केली.

राज्यातील रस्त्यांच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांनी संयुक्तपणे मंत्रालयात वॉर रुम स्थापन करून रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. रस्त्यांची कामे करताना आजची पूरस्थिती लक्षात घेऊन पूलांची उंची वाढवावी लागेल असे सांगून पाईपऐवजी बॉक्स स्ट्रक्चर बांधण्यासह पूरस्थितीच्या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

दीर्घकाळ टिकतील अशी रस्त्यांची कामे झाली पाहिजेत त्यासाठी गुणवत्तेवर विशेष लक्ष कंत्राटदार आणि त्यांच्यावर पर्यवेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिले पाहिजेत. विहित किंमतीपेक्षा कमी दराची निविदा भरलेली असली तरी गुणवत्तेचे काम करणे ही कंत्राटदारांची जबाबदारी असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, नाशिक-ठाणे महामार्गाची पावसामुळे वाईट अवस्था झाली असून खड्डे बुजविण्याचे काम सर्व संबंधित विभागांनी तातडीने पूर्ण करावेत आणि रस्त्यांची अपूर्ण असलेली कामे देखील लवकर पूर्ण करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

अतिवृष्टी आणि पावसामुळे राज्यातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पिय तरतुदीपैकी ५० टक्के निधी ऑक्टोबरअखेर वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही मात्र रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व मुख्य अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दररोज आढावा घेऊन व्यक्तिशः लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील जास्त पावसाच्या भागात डांबराऐवजी कॉंक्रिटचे रस्ते तयार केल्यास दर्जेदार आणि खड्डेविरहीत रस्ते तयार होतील यादृष्टीने भविष्यात निर्णय घेण्याचे सूतोवाचही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले.

या बैठकीत कोकण, मराठवाडा आदी भागातील रस्त्यांची स्थिती आणि सुरु असलेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले.

*राज्यातील राष्ट्रीय, राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग…*
● राज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग (सार्व.बांधकाम), राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली जातात.
● सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग मिळून एकूण ९१ हजार ९६५ कि.मी. लांबीचे मार्ग आहेत.
● सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ९३४७ कि.मी. चे असून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत ५५७७ कि.मी. आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित २८२५ कि.मी. चे राष्ट्रीय महामार्ग आहेत.

No comments to show.

Leave a Comment