Ads

-

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करा

By Xtralarge News

September 24, 2021 5:22 pm

Ads

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करा

परभणी, दि.२४ सप्टेंबर :
मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त प्रकल्पांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करून दिलासा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परभणी जिल्ह्यात जलसंपदा विभागाची आढावा बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. अनेक प्रकल्पांची दुरुस्ती, कालव्यांची दुरुस्ती व इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ममदापूर, जोड परळी, कोटा आणि पिंपळगाव कुटे हे नवे बंधारे पाणी उपलब्धतेअभावी प्रलंबित होते मात्र आता हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रस्तावित बंधारे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

जायकवाडी डावा आणि उजवा कालव्याची वाहन क्षमता कमी झाली आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेत या कालव्यांची सुधारणा केली जाईल व आधुनिकीकरण केले जाईल. उच्च दर्जाचे काम करत हे कालवे अत्याधुनिक केले जातील असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वडपूरकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

No comments to show.

Leave a Comment