Ads

---

राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर का टांगता ?

By Xtralarge News

September 22, 2021 6:29 pm

Ads

राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर का टांगता ?

भाजपा महिला आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

मुंबई, दि. 22 सप्टेंबर :
महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून राज्यात सुरू असलेला पत्रप्रपंच अजून थांबलेला नाही. राज्यपाल, मुख्यमंत्री पत्रानंतर आता भाजपाच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून राज्याच्या प्रत्येक समस्येवर केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे कर्तृत्व दाखविले आहे. आता राज्यातील महिला भयंकर असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत असताना व दिवसागणिक महिलांची अब्रू लुटली जात असताना देखील आपण संसदेच्या अधिवेशनाची मागणी करून राज्याची अब्रू थेट दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहात हे आम्हा सावित्रीच्या लेकींसाठी अनाकलनीय आहे, असे खरमरित पत्र भाजपाच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

राज्यातील महिलांच्या सन्मानाबद्दल आपण नेहमी छत्रपती शिवरायांच्या नीतीचा आदर्श ठेवत असतो. महाराष्ट्राच्या स्त्रीसन्मानाचा इतिहास आज खुंटीवर ठेवल्याच्या भावनेने आम्ही व्यथित आहोत. अन्य राज्यांतील गुन्हेगारीशी तुलना करून महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि महिलांवरील पाशवी अत्याचारांचे समर्थन होऊ शकणार नाही. या गुन्हेगारीस कठोर पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारनेच पावले उचलावयास हवीत. त्याकरिता, गृहखात्याच्या अखत्यारीतील अशा घटनांची मुख्यमंत्री या नात्याने दखल घेणे हे आपले कर्तव्य ठरते. केंद्र सरकार अधिवेशन आयोजित करण्याबद्दल सांगण्याऐवजी महाराष्ट्रातील या लज्जास्पद घटनांचे पाढे संसदेत वाचले जावेत अशी अपेक्षादेखील न करता, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे प्रमुख म्हणून आपण ठोस कृती करून महिलांना सुरक्षिततेची हमी द्यावयास हवी, असे या पत्रात म्हटले आहे.

 

 

No comments to show.

Leave a Comment