मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाची ॲलर्जी !
मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाची ॲलर्जी !
संघ विचारधारेतून शिक्षणाचे विकृतीकरण राजकीय फायद्यासाठी.
मुंबई, दि. 15 जुलै:
मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला अॅलर्जी आहे. त्यांच्याच घराण्यातील बहादुर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ चा इंग्रजांविरुध्दचा लढा समस्त हिंदू राजे लढले त्यात नानासाहेब पेशवेही होते. ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात तोही मुघलांनीच बांधला. पण मोदी सरकार शिक्षण क्षेत्राचे संघ विचारधारेतून राजकीय फायद्यासाठी करत असलेले विकृतीकरण नव्या पिढीला घातक आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
युजीसी अभ्यासक्रमातील मघुलांचा इतिहास वगळण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, इतिहास हा धर्म, जाती, चांगल्या वाईटाचा नसतो. ती मानवीय प्रवासातील घटनांची नोंद असते. भारताचा प्रवास अभ्यासाचा विषय असावा. मुघल किंवा इतर परकीय शासक हे अत्याचारीच होते हे दाखवून विशिष्ट समाजाप्रती द्वेष निर्माण होऊन राजकीय फायदा घेणें हा मोदी सरकारचा उद्देश आहे. इतिहासाला धार्मिक व जातीयवादी दृष्टिकोनातून पाहणारे मोदी सरकार भारताचे कधीही न भरून येणारे नुकसान करत आहेत. कांँग्रेसने देश घडवला, सहिष्णू वैज्ञानिक दृष्टिकोन दिला परंतु भाजपा देशाचा चेहरा बिघडवत आहे.
अत्याचाराचीच नोंद घ्यायची असेल तर मनुवादातून बहुजनांवर झालेले हजारो वर्षांचे अत्याचार सर्वात भयानक म्हणावे लागतील. एकलव्य, शंभूकापासून सुरु करुन बौद्ध स्तूप तोडली त्यामागील मानसिकताही अभ्यासावी लागेल. संघाचा मनुवाद, ब्रिटिशांशी संगनमत व देशविरोधी कारवायाही अभ्यासाव्या लागतील. विद्यार्थ्यांचा २१ व्या शतकातील वैज्ञानिक व प्रगतीशील दृष्टिकोन तयार व्हावा व राष्ट्रीय एकता मजबूत व्हावी हा उद्देश नाही. मानवता, करुणा व सद्भावना हे मनुष्याचे गुण आहेत. भगवद्गीतेमध्ये षड्रिपूंचा त्याग हे जीवन ध्येय दर्शवले आहे. द्वेष, तिरस्काराने समाजाची प्रगती साधू शकत नाही, असेही सावंत म्हणाले.
