नाना पटोलेंचा ‘तो’ आरोप माहितीच्या अभावामुळे !
नाना पटोलेंचा ‘तो’ आरोप माहितीच्या अभावामुळे !
मुंबई, दि. 12 जुलै:
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या हालचालीवर व कार्यक्रमावर पहारे बसवण्यात आले आहेत. ही माहिती गृहमंत्रालय, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पुरवते असा आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. परंतु पटोले यांनी माहितीच्या अभावी हा आरोप केला आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
नवाब मलिक म्हणाले, राज्यात सरकार कुणाचेही असो राजकीय कार्यक्रम, आंदोलने, बैठका किंवा महत्त्वाचे नेते, मंत्री त्यांच्या हालचालीची नोंद ठेवण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक असतं. ते सर्व पक्षांची माहिती संकलित करून तो खात्यांतर्गत रिपोर्ट करत असतात आणि संकलित माहिती गृहखात्याकडे जमा होते. ही सिस्टम नाना पटोले यांना माहीत नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चौहान यांच्याकडून माहिती करून घेतली पाहिजे. जर नाना पटोले यांना वाटत असेल की, त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस नको, त्यांच्या नेत्यांना, मंत्र्यांना पोलीस बंदोबस्त नको तर तसा अर्ज केला तर त्याबाबतीत गृहमंत्री काय तो निर्णय घेतील असेही नवाब मलिक म्हणाले.
