आशिष शेलार, ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नाव सांगा !
आशिष शेलार, ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नाव सांगा !
मुंबई, दि. १२ जुलै :
शरद पवारसाहेबांनी भाष्य केल्यानंतर ‘चोर के दाढी मे तिनका’ असं वक्तव्य भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार यांनी केलं मात्र त्यांनी ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नाव काय हे आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
दर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद होणार असून आज या पत्रकार परिषदेची सुरूवात झाली. पहिल्याच पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजपला निशाण्यावर घेत जोरदार फटकेबाजी केली.
योगी आदित्यनाथ यांची ‘दोन मुलांची’ पॉलिसी असेल किंवा अमित शहा यांच्या सहकार खात्याबद्दल भाजपकडून देण्यात येत असलेल्या धमक्या असतील आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही नवाब मलिक यांनी भाष्य करत सबुरीचा सल्ला दिला.
पवारसाहेबांनी २०१३ साली युपीए सरकारच्या काळात सहकाराला घटनात्मक सुचित टाकून स्वायत्तता देण्याचे काम केले. परंतु या स्वायत्ततेवर कोण गदा आणत असेल तर त्यावर नंतर बोलू मात्र कायद्याचं राज्य असतं. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. एखादा व्यक्ती मंत्री झाला म्हणून सर्व अधिकार मिळतात असं नाही. त्यामुळे भाजपच्या लोकांनी जबाबदारीने बोलावं असा इशाराही नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांना यावेळी दिला.
*योगींनी दोन मुलांचे धोरण आणण्याऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणावे…*
उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार ‘दोन मुलांचे’ धोरण आणत आहे. हे धोरण महाराष्ट्रात २००० मध्येच तयार करण्यात आलेले आहे. मात्र योगी आदित्यनाथ ‘दोन मुले’ हे धोरण आणून संपूर्ण देशात गोंधळ घालत आहेत त्यांनी दोन मुलांऐवजी भाजप नेत्यांच्या वक्तव्यानुसार जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे असा घणाघाती आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.
दोन मुलांच्यावर मुल झालं तर त्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा शासकीय लाभ घेता येत नाही हे महाराष्ट्रात धोरण ठरलेले आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी योगींना करुन दिली.
भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत त्यांची मुलं नाहीत. किंवा भाजपची मातृसंस्था आरएसएसमध्येसुध्दा असे लोक आहेत ज्यांना मुलंच नाहीत. दोन मुलं ही पॉलिसी बर्याच राज्यात आहे. त्यामुळे योगींनी ‘मुलं नकोत’ ही पॉलिसी अंमलात आणली पाहिजे कारण मुलं नाहीत त्यांना प्रोत्साहन मिळेल असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
भाजपचे साक्षी महाराज असतील किंवा त्यांच्यासारखे अनेक लोक आहेत. जे जास्त मुलं जन्माला घाला अशी सारखी – सारखी वक्तव्य करत आहेत. त्यांचं ऐकून योगीजींनी पॉलिसी निर्माण करावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला.
