सोलापुरात १६ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन !
सोलापूर, दि. १२ जुलै २०२०
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोलापूर शहर आणि नजिकच्या तालुक्यातील काही गावांत १६ जुलै ते २६ जुलै या कालावधीत पुर्ण संचारबंदी (लॉकडाऊन) करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लॉकडाऊनबाबत अधिकाऱ्यांनी एकत्रित बसुन निर्णय घ्यावा त्या बाबतचा कालावधी, नियमावली ठरवावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महापौर,महापालिकेचे गटनेते आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करुन लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात लॉकडाऊन लागू करावा, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सुचविले होते. त्यानुसार यावर व्यापक चर्चा करुन 16 जुलै ते 26 जुलै सोलापूर शहर आणि नजिकच्या तालुक्यातील काही गावात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले की, पुर्वीप्रमाणेच 16 ते 26 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांनी आवश्यक वस्तू येत्या तीन-चार दिवसात खरेदी करुन ठेवाव्यात. लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
लॉकडाऊन कालावधीत कोणत्या सेवांना सवलत दिली जाईल, याबाबतचे सविस्तर आदेश रविवारी जाहिर केले जातील. लॉकडाऊनच्या या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेकडून रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असणारे किट येत्या तीन चार दिवसात प्राप्त होतील. नागरिकांनी या टेस्ट करुन घेण्यासाठी सहकार्य करावे असे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
कोरोना, कोविड१९, सोलापूर, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त,
