सरकार घरात आणि विरोधी पक्षनेते लोकांच्या दारात !
मुंबई, दि. ११ जुलै २०२०
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे विधान हे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अश्या प्रकारचे आहे. सरकार म्हणून जनतेमध्ये जाऊन सुख-दु:ख समजून उपाययोजना करणे असते. ते न करता फक्त व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सरकारचा कारभार सुरु आहे. विरोधी पक्षनेते जर रुग्णांचे दुखः समजून घेत असतील तर त्यावर अशा प्रकारे टीका करणे हे उद्विगनेतून आलेले उद्गार आहेत, असे प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिले आहे.
पर्यटनमंत्र्यांना आवाहन करताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, विरोधी पक्ष नेते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या, रुग्णालयांमध्ये जाऊन या, तेथील कोविड रुग्णांची भेट घ्या,म्हणजे आपली संवेदनशीलता दिसून येईल. केवळ ठाणे महापालिकेला गेले व सर्व आयुक्तांना भेटून एक तासाची बैठक घेऊन नीट माहिती मिळत नाही व योग्य उपाययोजनाही होत नाहीत. ख-या अर्थाने उपाययोजना होत असत्या तर २ लाखांच्यावर रुग्णांची संख्या गेली नसती व १० हजार रुग्ण मृत पावले नसते. केवळ अपयश झाकण्यासाठी अश्या प्रकारे विरोधकांवर टीका करण्याचे काम होत आहे.
सरकारच्या कारभाराची लक्तरे विरोधकांनी वेशीवर टांगल्यामुळेच आदित्य ठाकरे यांना दुख होत आहे, त्यामुळेच अश्या टुरिझमच्या प्रतिक्रिया ते देत आहेत. दोन वेळा मी क्वारांटाईन झालो, दोन वेळा कोविडचे टेस्टिंग करुन घेतले पण त्यामुळे घाबरुन आम्ही आमचे दौरे रद्द केले नाहीत व लोकांच्या दारात जाणे थांबविले नाही. सरकार आपल्या घरात आणि विरोधी पक्ष नेते लोकांच्या दारात, याचाच पोटशूळ त्यांना होतोय असा टोलाही दरेकर यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना लगाविला.
