पंतप्रधान संवेदनशील आहेत, राज्याला मदत करतील !
पंतप्रधान संवेदनशील आहेत, राज्याला मदत करतील !
मदतीपासून कोणीही वंचित रहाणार नाही.
रत्नागिरी, दि. 21 मे :
चक्रीवादळ भीषण होते जे काही नुकसान झाले आहे
केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देणार आहोतच आणि राज्य सरकार म्हणून आणखी जे काही करता येणं शक्य असेल ते केले जाईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. केंद्रानेही अधिकाधिक मदत करावी म्हणून विनंती करीत आहोत. पंतप्रधान संवेदनशील आहेत, आम्हाला राजकारण करायचे नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनारपट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत द्यावी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही असे ही उध्दव ठाकरे रत्नागिरी येथे म्हणाले.
जिल्हयात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
तौक्ते चक्रीवादळाने जिल्हयातील 5 तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले.यात अधिक नुकसान राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदूर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्हयांचा पहाणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. याची सुरुवात रत्नागिरी येथील बैठकीने झाली.
जिल्हयात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पध्दतीने करुन नेमेकेपणाने आकडेवारी सह प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर अधिकाऱ्यांशी बोलताना दिले.
बैठकीसाठी व्यासपीठ उभारले असले तरी तेथे न जात मुख्यमंत्री महोदयांनी व्यासपीठा समोरील डी मध्ये खुर्च्या लावण्यास सांगितले व साधेपणाने सादरीकरण व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्वागतासाठी हार – बुके देखील नको अशा सूचना दिलेल्या असल्याने साध्या पध्दतीनेचे पूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी आमदार हुस्नबानु खलिफे, जि.प. माजी अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष बंडया साळवी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा इन्दुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदी मान्यंवर उपस्थित होते.
