अहमदनगर कोरोना पॅटर्नची प्रधानमंत्र्यांकडून दखल !

0
20210521_105755

अहमदनगर कोरोना पॅटर्नची प्रधानमंत्र्यांकडून दखल !

मुंबई, दिनांक 21 मे :
हिवरेबाजारने गावात आरोग्य व स्वयंसेवकाच्या ४ टिम स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. करोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या टीमने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दुध दुभत्याच्या कामाचे काय होणार ही काळजी मिटली. ज्यांचा सुरुवातीला विलगीकरणात जाऊन उपचाराला विरोध होता ते या प्रयत्नामुळे विलगीकरणात राहून उपचार घेण्यास तयार झाले.  यातूनच करोनामुक्त हिवरेबाजारची वाटचाल सोपी होऊन गाव काही कालावधीतच करोनामुक्त झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिली व हिवरेबाजारचा हा करोनामुक्तीचा पॅटर्न पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असल्याचे सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समजून घेतली तसेच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांची प्रयत्नांची आणि अनुभवाची ही शिदोरी पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या जाव्यात, जिल्ह्याच्या ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो होणार नाही आणि जिथे झाला आहे तिथे कडक उपाययोजनांद्वारे तो नियंत्रित करून जिल्ह्यातील गावे कोरोनामुक्त होतील यादृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचनाही मोदी यांनी यावेळी केल्या.

प्रधानमंत्री मोदी यांनी तिसऱ्या लाटेत युवक आणि बालकांना कोरोना लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन बालरोग तज्ज्ञांची टीम तयार करण्यात यावी, बालकांच्या मापाचे छोटे ऑक्सीजन मास्क तयार ठेवावेत, कोरोनामुक्तीसाठी जनजागृती वाढून कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, लसीचा एकही डोस वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी अशा काही सुचनाही केल्या.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कोरोना प्रतिबंधक कामाची दखल खुद्द प्रधानमंत्री मोदी यांनी घेऊन त्यावर समाधान व्यक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले व ते करत असलेले कौतूकास्पद काम यापुढेही सुरु ठेवावे असे आवाहन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *