मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला !
मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला !
मुंबई, दि. १९ मे :
राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाते ४५ सदस्य असताना ते ५-७ व्यक्तीचे काम एकटेच करत असत. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खा. राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्व. खा. राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते, यावेळी राहुलजी गांधी बोलत होते.
आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधीजी म्हणाल्या की, राजीव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षावर विविध भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. सातव कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना.
मल्लीकार्जून खर्गे म्हणाले की, कोरोनाने आमचा एक युवा साथीदार आम्हाला सोडून गेला हे मनाला पटत नाही. पक्षासाठी सदैव तत्पर असणारा, पक्षनेतृत्वाचा विश्वास, काम करण्याची क्षमता असलेला, काँग्रेस पक्षातील पुढच्या पिढीतील भवितव्य होते. ते वंचितांचा आवाज, तरुणांचे प्रेरणास्रोत होते. कमी वयातच त्यांनी कारकिर्दिला सुरुवात करुन आपल्या कामाच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर पोहचले. संसदेत ते सामान्य जनतेसाठी आवाज उठवत असत. फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती.
गुलाम नबी आझाद म्हणाले की, राजीव सातव यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला. राजीव लहान असल्यापासून आपण त्यांना ओळखत होतो. त्यांच्या कुटुंबियांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने सातव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या निधनाने पक्षाचा तसेच कुटुंबाचा मोठा आधार गेला आहे.
