अलमट्टीच्या पाण्यावरुन महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये चर्चा!
मुंबई दि. ९ जुलै २०२०
महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यात अलमट्टी धरणाच्या पाण्यावरून दरवर्षी वाद होतात. पावसाळ्यात सांगली, सातारा भागात तर अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे मोठे नुकसान होते. हे नुकसान कसे टाळता येईल यासाठी दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री व अधिकारी यांच्यात मुंबईत एक बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मागीलवर्षी दोन्ही राज्यांना पूराचा मोठा फटका बसला होता. या अनुषंगाने यंदा ही पूरपरिस्थिती टाळण्यासाठी बैठक घेण्यात आली. दोन्ही राज्यात समन्वय साधण्यासाठी शासन तीन समित्या स्थापन करण्याच्या विचारात आहे. या समित्या इंजिनियरस्तरीय, सचिवस्तरीय व मंत्रीस्तरीय असणार आहेत. पूर येण्याआधी दोन्ही राज्यांना अलर्ट कसा दिला जाऊ शकतो याबाबतीतही चर्चा झाली. गेल्या २०-२५ वर्षात कृष्णा खोऱ्यात अलमट्टी धरणापर्यंत विविध बांधकामे झाली आहेत. त्यामुळे पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो. या सर्व बांधकामांचे येत्या काळात ऑडिट केले जाईल. हे अडथळे दूर करण्यासाठीही दोन्ही राज्य प्रयत्नशील राहणार असेही या बैठकीत ठरले.
महाराष्ट्रातून कर्नाटकाला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा काही भाग सांगली जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या जत तालुक्याला कसा दिला जाईल याबाबतही विचार दोन्ही शासन करणार असल्याचे ठरविण्यात आले. पाणी सुरक्षिततेसाठी विविध प्रश्नांवर दोन्ही सरकारचे एकमत होण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी दोन्ही सरकार प्रयत्न करणार आहे.
