संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करा.

0
IMG-20210514-WA0065

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करा.

पुणे, दि. १४ मे :
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्यशासन व प्रशासनाच्यावतीने आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून यादृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. याद्वारे लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, हॉस्पिटल, नायडू रुग्णालय या रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. ‘म्युकर मायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा पुरवठा रुग्णालयांना सुरळीत होण्यासाठी तसेच यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी या औषधांचा पुरवठा देखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यात ४४ ऑक्सीजन जनरेशन प्लांट प्रस्तावित आहेत. यापैकी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी २ असे एकूण ४ ऑक्सीजन जनरेशन प्लांट सुरू झाले आहेत,अन्य ऑक्सिजन जनरेशन प्लांट देखील लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या

कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने ४५ वर्षांवरील अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात या आठवड्यात रुग्णदर कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, ग्रामीण भागात अद्याप संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण होण्यासाठी कार्यवाही करा. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा. ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता, रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच म्युकर मायकोसिस आजारावरील औषधसाठा, लहान बालकांसाठी आवश्यक औषधसाठा,वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तयारी करा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *