पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले !
पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले !
पंढरपूर, दि. १५ एप्रिल :
भाजपचे सरकार येईल असं देवेंद्र फडणवीस वारंवार खोटं बोलत असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास नको म्हणून आम्ही गप्प आहोत. अन्यथा भाजपचा आमदार फुटला आणि आणखी एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी मोदी साहेबांकडून पैसे आणू असे सांगितले अहो पैसे कुणी मागितले? योजना पूर्ण करण्याची महाराष्ट्र सरकारमध्ये ताकद आहे असा विश्वास व्यक्त करतानाच पंढरपूर – मंगळवेढ्याच्या जनतेची इतकी काळजी होती तर मागच्या ५ वर्षात कामे का नाही केले? असा खोचक सवालही जयंत पाटील यांनी केला आहे. पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
मंगळवेढा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पंढरपूरात आहेत. भगीरथ भालकेंना असलेला जनाधार पाहता इथल्या लोकांनी निवडणुकीपूर्वीच त्यांना आमदार ठरवले आहे हे स्पष्ट दिसून येते असेही जयंत पाटील म्हणाले.
पंढरपूर – मंगळवेढा या मतदारसंघासाठी भारत नानांनी बरेच कष्ट घेतले आहेत. म्हणूनच पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने भल्याभल्यांना बाजूला ठेवून तीन वेळा भारत नानांना निवडून दिले. आजही तीच परिस्थिती आहे, काहींनी धनदांडग्यांना उमेदवारी दिली असली तरी लोकांनी भगीरथ भालके यांना खंबीर पाठिंबा दिला आहे असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मधल्या काळात बरेचजण आम्हाला सोडून गेले पण भारतनानांनी विरोधी विचारांची कास धरली नाही. आमच्या पडत्याकाळात आम्हाला साथ दिली. अडचणीच्या काळात जे साथ देतात त्यांना आपण कधीच विसरत नसतो, आम्हीही भारत नाना आणि त्यांच्या कुटुंबाला सदैव साथ देणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
भारत नानांचा लोकांशी दांडगा संपर्क होता. ते सतत लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी उपलब्ध असायचे. लोकांच्या अडीअडचणींमध्ये धावून जायचे. आपल्याला ही परंपरा कायम ठेवायची आहे. त्यासाठीच महाविकास आघाडीने आपल्याला भगीरथ यांच्या रुपाने तरुण उमेदवार दिला आहे. नानांच्या भगीरथाला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी पंढरपूर – मंगळवेढ्यातील जनतेला केले.
