कुंभमेळ्याने कोरोनाचा अणुबॉम्बच फोडला !
कुंभमेळ्याने कोरोनाचा अणुबॉम्बच फोडला !
कोरोना ‘भगवा किंवा हिरवा’ रंगाची पर्वा करीत नाही.
मुंबई, दि. १५ एप्रिल:
हरिद्वारच्या कुंभमेळय़ाने कोरोनाचा अणुबॉम्बच फोडला आहे. कुंभमेळय़ात सहभागी झालेल्या शेकडो साधू-संत आणि गंगेत डुबकी मारणाऱ्या पवित्र आत्म्यांना कोरोना झाला आहे. आता हे लोण पसरत जाईल. देशभरात कोरोना धुमाकूळ घालीत असताना धर्म, सण, उत्सव यावर नियंत्रण ठेवावेच लागेल, असे खणखणीत टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे.
उत्तर प्रदेशात मंगळवारी एका दिवसात १८ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. आठवडाभरात त्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत २०४ टक्के एवढी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तर साधू-संन्यासी- तपस्वी, पण स्वतःच विलगीकरणात पोहोचले. मुख्यमंत्री कार्यालयात कोरोनाची ‘लहर’ आली आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातमधील सुरत वगैरे ठिकाणी कोरोनामुळे मृतांचा खच पडत असून स्मशानांतील लोखंडी सळय़ाही वितळून गेल्या इतके मृतदेह तेथे दहन केले जात आहेत.
झारखंड, छत्तीसगढ येथील सरकारी रुग्णालयांत मृतांचा खच पडला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात या राज्यांत उच्च न्यायालयास हस्तक्षेप करून ‘लॉकडाउन करा’ असे सांगावे लागत आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्राने घेतले तसे इतर राज्यांनी कोरोनाचे प्रकरण गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.
कोरोनाचा विषाणू भगवा किंवा हिरवा अशा कोणत्याच रंगाची आणि धर्माची पर्वा करीत नाही. हा विषाणू अमानुष आहे व कुणालाच सोडत नाही. सध्याच्या संकटाच्या स्थितीत लोकांनी शिस्त पाळायलाच हवी, पण शिस्त फक्त मरकजवाल्यांनी किंवा रमजानवाल्यांनीच पाळावी, चर्च किंवा गुरुद्वारांनी पाळावी या मानसिकतेतून आता बाहेर पडले पाहिजे, असे खडे बोल भाजपा-संघपरिवाराचे नाव न घेता या अग्रलेखातून सुनावण्यात आले आहेत.
