जम्बो कोविड सेंटर्स खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावी !
जम्बो कोविड सेंटर्स खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावी !
महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो, कोरोना विरुद्ध एकवटून त्याला हरवूया.
मुंबई, दि. ९ एप्रिल :
कोरोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोना विरुद्ध अशाचप्रकारे एकवटून त्याला हरवू या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ञ डॉक्टर्स यांना केले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकीत खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ञांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे,सचिव आबासाहेब जराड, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, धर्मदाय आयुक्त चौरे, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडीत उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाशी युद्ध पुकारले ते सुरूच आहे. प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहात. मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना शिथिलता आली आणि कोरोनाने अक्राळ विक्राळ रूप धारण करून हल्ला चढवला आहे त्यामुळे आताची परिस्थीती वेगळी आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या या कठीण काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या सुविधा वाढवून रुग्णांना दिलासा द्यावा. शासनाने जम्बो कोविड सेंटर्स उभारले आहेत त्यातील काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे, असे आवाहन करतानाच या सेंटर मध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटर्संविषयी असलेली भावना दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. ही एकजूट सर्व थरांमध्ये आणताणाच कोरोनाला हरवायचय आणि यातील तुम्ही महत्वाचा दुवा आहात असे मुख्यमत्र्यांनी खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना सांगितले.
