राज्यात लाॅकडाऊन लागणार का? मुख्यमंत्री काय म्हणाले?
राज्यात लाॅकडाऊन लागणार का? मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुंबई, दि. 2 एप्रिल:
राज्यातील कोरोना रुग्णांची झपाट्याने होत असलेली वाढ आणि वारंवार आवाहन करूनही सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी पहाता राज्य सरकार लाॅकडाऊन लावेल असे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक वरून जनतेशी संवाद साधताना लाॅकडाऊन लावण्याचे स्पष्ट संकेत दिले असून दोन दिवसात निर्णय घेऊ असा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी म्हणालो होतो की परिस्थिती अशीच राहिली, तर आपल्याला लॉकडाऊन लागू करावा लागतोय की काय, अशी शक्यता होती. ती परिस्थिती आजही कायम आहे. मधल्या काळात आपण शिथिल झालो, लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलनं सुरू झाले. करोना गेला, अशा रितीने सगळं सुरू होतं. दुर्दैवाने जी भिती सगळे तज्ज्ञ व्यक्त करत होते, ती खरी ठरली. मार्चमध्ये गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ विक्राळ रुप धारण करून करोना आला आहे.
आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीये. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
अर्थचक्र चालवायचंय, तर अनर्थ ओढवतोय. अनर्थ टाळायचा, तर अर्थचक्र थांबतंय. मधल्या काळात अनेक तज्ज्ञ सल्ले देत आहेत. सर्वसामान्यांना त्रास होईल, अशी लॉकडाऊनची भूमिका आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला आलेला झटका हा नियम नको. करोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन पर्याय नाही. हिटरलसारखे वागू नका. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असू शकत नाही. लॉकडाऊन लावायचा तर रोजगाराचे पैसे थेट खात्यात जमा करा. लॉकडाऊन हा उपाय नाही. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण झाल्यानंतर देखील काही प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. पण या सगळ्यापेक्षा मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही नियम पाळा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
