सोमय्या विरोधात वायकरांनी ठोकला १०० कोटींचा दावा !

0
20210313_153619

सोमय्याविरोधात वायकरांनी ठोकला १०० कोटींचा दावा !

मुंबई, दि. २ एप्रिल :

स्वत:च्या फायद्यासाठी अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी करुन जनमानसातील प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास दिल्याप्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अबु्नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

अलिबाग कोर्लई येथील संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध समाजमाध्यमांद्वारे केला होता. यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा तसेच या दोघांमधील आर्थिक हितसंबंध काय आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे विविध प्रसामाध्यमांनीच पुढे उघडकीस आणल्याने सोमय्या या प्रकरणी तोंडघशी पडले.

महाकाली गुंफा येथील जमिनप्रकरणी वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवांकडून २५ कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत विविध समाजमाध्यमांद्वारे केला. हे आरोप करतानाही त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नाहीत.

किरीट सोमय्या हे सातत्याने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी आपली जनमानसातील प्रतिमा, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास देत असल्याने, वायकर यांनी सोमय्या यांना या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास सिव्हील व क्रिमिनल कायदेशी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या दोन्ही प्रकरणी वायकर यांनी मुंबई पोलिस आयुक्त तसेच एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यास पत्र देऊन बेताल वक्तव्ये करणार्‍या किरीट सोमय्या यांना लगाम घालण्यासाठी कारवाई करण्याची विनंतीही केलेली आहे.

आमदार रविंद्र वायकर यांनी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा अबुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. लवकरच क्रिमीनल दावाही दाखल करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *