सलूननंतर आता हॉटेल्स सुरु करण्याचा सरकारचा विचार!
Hotels-Governt
मुंबई, दि ५ जुलै २०२०
कोरोनामुळे सर्वच उद्योगांचे तीनतेरा वाजले असून अजून सर्व व्यवहार सुरुळीत सुरु झालेले नाहीत. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने परवानगी देत आहे परंतु कोरोनाची टांगती तलवार आहेच. काही दुकानांना परवानगी दिलेली आहे आता हॉटेल्सही सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हॉटेल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चाही झाली आहे.
मिशान बिगीन अगेनचा नारा देत राज्यात उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी.जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज जे स्थानिक कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकटसमयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.
