लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे.
लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे.
केवळ मुंबई-पुण्यावरच लक्ष केंद्रित करू नका..
मुंबई, दि. 28 मार्च:
कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करताना अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की,’गेल्या वर्षी आपण टप्प्याटप्प्याने सर्व आरोग्य सुविधा वाढवल्या, फिल्ड रुग्णालये उभारली पण आताच्या या संसर्गात या सुविधा कमी पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन ८० टक्के वैद्यकीय व २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावे, रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही व रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
ई आयसीयूचा मोठ्या प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीने देखील आरोग्य विभागाने त्वरित पाउले उचलावीत.
लोकांना कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाही अशी भीती आहे, ती त्वरित काढणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
