रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी !
रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी !
धोका टळला नाही उलट अधिक वाढला….
मुंबई, दि. २६ मार्च :
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवार २८ मार्च २०२१ पासून रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही दिल्या.
ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनेही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
जनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की आपण बेड्स, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी.
मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस. ओ. पी ची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्निसुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यु व ऑक्सीजन बेडसची संख्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खूप वाढवले आहे, मुंबईत दिवसाला 50 हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्टींगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
