‘तो’ अहवाल म्हणजे भिजलेला फटाका !
‘तो’ अहवाल म्हणजे भिजलेला फटाका !
मुंबई, दि. 23 मार्च:
महाराष्ट्रातील पोलीस बदली रॅकटचा भांडाफोड करून त्याची चौकशी सीबीआय ने करावी या मागणी साठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली सरकारला साकडे घातले. यावर राजकारण तापले असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या पुराव्यांची हवा काढून टाकली. फडणवीसांनी दिलेला फोन टॅपिंगचा अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका निघाला त्याला वातही नव्हती, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की,
‘विरोधी पक्षनेते काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतीलं. विरोधी पक्षनेते जो काही बॉम्ब घेऊन आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसं काही दिसलं नाही.
काही चुकीचं झालं असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम आहे, त्यासाठी केंद्रात येण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील सगळा डाटा घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली तर महाराष्ट्राची भ्रत राहते. पण त्यात काही दम नसल्याने ते दिल्लीत आले. दिल्लीत अशा प्रकारचे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे. आम्ही याकडे गंमत म्हणून पाहत आहोत.
ज्या परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन सगळा गोंधळ सुरु आहे त्यांच्याच आग्रहाखातर आपण महाराष्ट्रात सीबीआयवर बंदी घातली. तेच परमबीर सिंह सीबीआय तपासासाठी चालले आहेत. त्यात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस सीबीआय चौकशीसाठी येथे येत आहेत. अशा प्रकारची अनेक पत्रं अनेक राज्याच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत, असेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
