Ads

--

परमविरसिंहांच्या पत्रावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत?

By Xtralarge News

March 21, 2021 6:40 pm

Ads

परमविरसिंहांच्या पत्रावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत?

सचिन वाझेंच्या गाड्या कोण-कोण वापरत होते ?

नागपूर, दि. 21 मार्च
परमविरसिंह यांच्या पत्राने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपाने सरकार विरोधात राळ उडवून दिली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा ठाकरे सरकार वर निशाणा साधला.

परमवीरसिंग यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माहिती दिल्याचे सांगितले आहे. मग मुख्यमंत्री का बोलत नाहीत? परमवीरसिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा  राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही, असा हल्लाबोल देेवेंद्र फडणवीस यांनी केला आहे .

सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण, अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकसारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणच हे होते, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अधीन राहून काही फोन सर्व्हिलन्सवर होते. त्यातून जितके गंभीर प्रकार पुढे आले, ते फारच गंभीर आहेत. बदल्यांचे एक मोठे रॅकेट आढळून आले. सुबोध जयस्वाल यांची तर बदली होणार नव्हती, ते कंटाळून सोडून गेले असे फडणवीस म्हणाले.

परमवीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले. पण, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला शरद पवार विसरले. ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. ते केवळ परमवीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी 15-20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

सरकारचे कसे आहे…आम्ही भ्रष्टाचार करू, दुराचार करू, अनाचार करू. फक्त विरोधक बोलले की, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू, आता अशा वाक्यांची आता आम्हाला सवय. त्याने फार काही फरक पडत नाही.अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment