लेटरबाॅम्बः पोलिसांना दरमहा १०० कोटी वसूलीचे टार्गेट !

0
20210321_104016

लेटरबाॅम्बः पोलिसांना दरमहा १०० कोटी वसूलीचे टार्गेट !

परमविरसिंह यांचा थेट गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप.

मुंबई , दि. 21 मार्च :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट घडवून आणला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमविरसिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटींचे हप्ते वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते, असा खळबळजनक आरोप सिंह यांनी या पत्रात केला आहे.

मुंबईतील 1750 बार, दारुची दुकाने, पब्ज आणि हुक्का पार्लर चालकांकडून महिन्याला ४०-५० कोटी रुपयांचे हप्ते जमा होऊ शकतात आणि अन्य मार्गांनी बाकीची रक्कम जमा करता येईल, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी तत्कालिन साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि सहायक आयुक्त संजय पाटील यांना दिल्या होत्या. वाझे यांनी ही बाब त्याच दिवशी आपल्या कानावर घातली होती, असे सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले.

देशमुख यांनी ४ मार्च रोजी पोलीस उपायुक्त भुजबळ आणि समाजसेवा शाखेचे सहायक आयुक्त संजय पाटील यांना ज्ञानेश्वारीवर बोलावून घेतले. मात्र देशमुख यांच्यावतीने त्यांचे स्वीय सहायक पालांडे यांनी भुजबळ, पाटील यांना हप्ते वसूल करण्याचा तोच ‘हिशोब’ समजावून सांगितला. त्यानंतर सहायक आयुक्त पाटील आणि वाझे यांनी आपापसात चर्चा केली. ते दोघेही मला भेटण्यासाठी आले. दोघांनी गृहमंत्र्यांच्या मागणीबाबत मला सूचित केले, असा दावा सिंह यांनी पत्रात केला आहे.

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुंबईत नोंदवा, असा हट्ट गृहमंत्री देशमुख यांनी धरला होता. डेलकर यांनी आत्महत्या मुंबईत केली असली तरी त्यांना हे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणारे प्रसंग दादरा-नगर हवेली येथे घडले आहेत. हद्दीच्या वादाबरोबर येणाऱ्या अडचणींबाबत तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतरच मी माझे मत मांडले होते. मात्र ते अव्हेरून देशमुख यांनी विधानसभेत विशेष तपास पथकाची घोषणा केली, असा आरोपही सिंह यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *